Tuesday 10 September 2013

3 – अक्षर उच्चाराचे प्रमाण ‘मराठीतील व्यंजन’



कवितेचे विद्यालय –
3 – अक्षर उच्चाराचे प्रमाण ‘मराठीतील व्यंजन’

ध्वनीचा उच्चार आपण मुखातून करतो आणि कानांनी तो ऐकू येतो. या श्राव्य आणि मौखिक ध्वनीतले सुक्ष्मतम भाग मराठीने अक्षरातल्या व्यंजन-स्वरांमध्ये स्विकारले आहेत. व्यंजनांची निर्मिती ‘स्पर्श, अंतस्थ, उष्मे, महाप्राण, घर्षण’ अशा वर्णनातून व्यक्त होणार्‍या आघातातून होते. यात मुखातील ‘ओठांचा ओठांशी’ वा ‘जिभेचा टाळूशी’ वा ‘हवेच्या स्फोटासाठी केवळ जिभेचा’ (‘ह’ व्यंजनासाठी) असा वापर होतो. झालेल्या अशा एकाच आघातातून मराठीतील व्यंजने साकारतात. तसेच ऐकू येणार्‍या मराठी व्यंजनातील ध्वनी हा केवळ एकाच ‘जातीगुणवैशिष्ट्या’चा असतो. ‘जातीगुणवैशिष्ट्य’ म्हणजे ध्वनीतील असा गुणधर्म जो ध्वनीच्या ‘उच्च-नीचता’ (Frequency), लहान-मोठेपणा (Loudness), उच्चाराने घेतलेला वेळ (Duration of Time), यांच्याशी संबंधीत नसतो. ‘जातीगुणवैशिष्ट्य’ म्हणजेच ध्वनीतील खास खुबी, विशेष गुण, विशिष्ट लक्षण, आवाजाची पोत (Trait of Sound) होय. मराठीने स्विकारलेल्या ध्वनीतील खास ‘जातीगुणवैशिष्ट्यां’ना व्यंजन व स्वर नावांने आपण ओळखतो.

उच्चारीत ध्वनीपैकी अक्षरातल्या व्यंजनाचा उच्चार सर्वात कमी वेळेत संपतो आणि तो ऐकू सुद्धा येतो. तुम्ही ‘प, का, तो’ श्वास टिकेपर्यंत लांबलचक उच्चारा. त्यातील केवळ ‘अ, आ, ओ’ स्वर लांबवता येतात. त्यातील ‘प्, क्, त्,’ व्यंजने केवळ क्षणभर टिकतात. सर्व व्यंजने केवळ क्षणभर टिकतात तरीही त्यांची भिन्न ओळख आपल्याला होते. म्हणजेच ‘क्षणभर टिकणे’ या उच्चाराने घेतलेल्या वेळेमुळे व्यंजनाची ओळख होत नाही. व्यंजनाची ओळख मानवाला त्या ध्वनीतील खास खुबी, विशेष गुण, विशिष्ट लक्षण, आवाजाची पोत (Trait of Sound) म्हणजेच ध्वनीतील ‘जातीगुणवैशिष्ट्य’ यामुळे होते. तुम्ही ‘प, का, तो’ श्वास टिकेपर्यंत लांबलचक उच्चारलात. समजा हा श्वास टिकेपर्यंतचा लांबलचक उच्चार ‘क्ष’ सेकंदाचा झाला. म्हणजे त्यातील ‘अ, आ, ओ’ स्वर हे समान ‘क्ष’ वेळेत उच्चारले गेले, असे समजू. उच्चारातील ‘क्ष’ कालावधी ही स्वराची ओळख ठरत नाही. स्वराची ओळख सुद्धा मानवाला त्या ध्वनीतील खास खुबी, विशेष गुण, विशिष्ट लक्षण, आवाजाची पोत (Trait of Sound)  म्हणजेच ध्वनीतील ‘जातीगुणवैशिष्ट्य’ यामुळे होते. व्यंजन-स्वर हे ध्वनीतली खास ‘जातीगुणवैशिष्ट्ये’ ठरतात. ‘अक्षर’ आणि ‘अक्षराने घेतलेला उच्चारातील वेळ’ हे दोन भिन्न घटक वा दोन तटस्थ गोष्टी आहेत.

मराठी भाषा ‘उच्चार, अक्षर, चिन्ह, लेखन, अर्थ’ यांची जडणघडण ‘मराठमोळी’ लिपीतून अतिशय शास्त्रीयपणे आणि महत्त्वाचे म्हणजे सर्वात सुक्ष्मतेने वापरते. मराठीतील व्यंजनात केवळ एकच ‘जातीगुणवैशिष्ट्य’ असते. मराठीने ‘चमचा’ शब्दातल्या उच्चारातील ‘च्’ व्यंजन स्विकारले आहे. मराठीने संस्कृतच्या ‘चाणक्य’ शब्दातल्या ‘च्य्’ उच्चाराचे व्यंजन स्विकारलेले नाही. ‘चाणक्य’ शब्दातील ‘च्य्’ उच्चारात सुरवातीला ‘चमचा’ शब्दा मधल्या ‘च्’ व्यंजनातले ‘जातीगुणवैशिष्ट्य’ असते जे शेवटी नसते. तसेच ‘चाणक्य’ शब्दातील ‘च्य्’ उच्चाराच्या शेवटी, ‘ययाती’ शब्दा मधल्या ‘य्’ व्यंजनातले ‘जातीगुणवैशिष्ट्य’ असते जे सुरवातीला नसते. म्हणजेच संस्कृतच्या ‘च्य्’ व्यंजनात दोन ‘जातीगुणवैशिष्ट्य’ असतात. मराठीत ‘च्यायला’ शब्द आहे आणि तो ‘च्य’ असा लिहीला जातो. या ‘च्य’चा उच्चार संस्कृत मधल्या ‘चाणक्य’ शब्दातील ‘च्’ (च्य्) सारखाच मराठीत होतो. आजवरच्या चुकीच्या मराठी-पुस्तकी-व्याकरणाने ‘संस्कृतातून मराठीत बरेच शब्द जसेच्या तसे आले’ असे घोषीत केल्याने मराठीची प्रचंड आबाळ, मानहानी, निंदा, अवहेलना झालेली आहे. यापुढे तरी मराठीचा मराठीसाठी मराठीपणातून केवळ मराठीपुरताच विचार करून मराठीने स्वतःच्या लिपीचे नाव ‘मराठमोळी’ असे जाहीर करून स्वतंत्र झाले पाहीजे.

मराठीतील ‘व्यंजन’ म्हणजेच ध्वनीतील केवळ एकच ‘जातीगुणवैशिष्ट्य’ हे यापुढे कृपया नीट लक्षात ठेवावे. त्यामुळे जोडाक्षराची मराठीतील व्याख्या अधिक शास्त्रीय आणि अचूक ठरते. ज्या अक्षर उच्चारात स्वराच्या उच्चाराआधी एकापेक्षा जास्त ‘व्यंजने’ असतील त्यांना मराठीत जोडाक्षर म्हटले जाते. त्यामुळे मराठीत ‘च्य’ हे जोडाक्षर ठरते, व्यंजन नाही. मानवाला स्वराच्या आधी जास्तीतजास्त केवळ चार ‘व्यंजने’ उच्चारता येतात. सोबत मराठी जोडाक्षरांच्या ‘जडणघडणी’चा तक्ता दिला आहे. यात केवळ ‘र्’चा उच्चार जोडाक्षरात प्रथम केल्यास, दोनदा करणे (केवळ दर्शवणे) शक्य आहे हेही कळेल. म्हणजे अशा वेळी जणू चार व्यंजने जोडाक्षरात भाग घेऊ शकतात!

अक्षरात एकच व्यंजन एकानंतर एक येऊन ‘प्प, क्क, च्च’ असे जोडाक्षर बनते. लेखनातून ‘प्प, क्क, च्च’ अशी जोडाक्षरे सुचवली जातात. यांचा उच्चार करताना मात्र आपण नक्की काय करतो? ते लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. तुम्ही ‘अपाअपा’ उच्चारा. आता ‘अप्पाअपा’ उच्चारा. यातील ‘प्पा’ उच्चारताना त्यातील ‘प्’ हे व्यंजन ओठांची हालचाल करून दोनदा उच्चारले जात नाही. ‘प्’ व्यंजनात अडकलेले वा गुंतलेले ओठ तसेच जास्त वेळ स्थिर ठेवून ‘प्’ व्यंजनाचा दोनदा उच्चार झाल्याचे आपण घडवतो वा सुचवतो. ‘प्’ या एका व्यंजनाला लागणार्‍या उच्चार वेळेच्या दुप्पट वेळ केवळ यात खर्च केला जातो. त्यातून ओठांची दोनदा हालचाल करून ‘प्’ व्यंजन दोनदा न उच्चारता ‘प्प्’ साकारले जाते. अशा लेखांतून ‘उच्चार, अक्षर, चिन्ह, लेखन, अर्थ’ यांचा परस्पर संबंध यातून स्पष्ट होत जाणार आहे.

मुलांना शिकवताना ‘प्’ हे व्यंजन वापरा. त्यामुळे मुलांना ओठांची हालचाल दिसते आणि कळते. त्यानंतर ‘क’ व ‘क्क’, ‘ट’ व ‘ट्ट’ अशा उच्चारातून जिभेची हालचाल ‘क्क’ आणि ‘ट्ट’ या जोडाक्षरात कशी एकाच जागी स्थिर राहते, ते त्यांचे त्यांना जाणवेल. कशी गम्मत आहे की नाही? पण हे असेच घडते, हे तुम्ही उच्चार करून, सिद्ध झाल्याचे घोषीत करू शकता. मराठीची जडणघडण अशा सहजसुलभतेने पटवता येते. टप्प्या टप्प्यातून आपण हेच घडवणार आहोत.

आता मराठीतील ‘र्‍य’ आणि ’र्य’ या जोडाक्षरांकडे वळू या. संस्कृतमध्ये आणि हिन्दी मध्ये ‘र्‍य’ नाही. मराठीतील हा दोष आहे असे मला सुद्धा लहानपणी संस्कृत-प्रचूर शिक्षकांनी सांगितले होते! पण संशोधनातून मराठीचे विलक्षण शास्त्रीय रूप सामोरे आले. ज्याप्रमाणे ‘पा’ नंतरच्या ‘प्पा’ उच्चारात जिभ केवळ जास्त वेळ ‘प्’ व्यंजनाच्या जागी स्थिर राहते तसेच ‘र्‍य’ मधल्या ‘र्’चा उच्चार ‘र्+य्+अ’ असा होतो पण ‘र्य’ मधल्या ‘र्’ चा उच्चार ‘र्+र्+य्+अ’ असा होतो हे लक्षात येईल. यात ‘र्’ उच्चारात गुंतलेली जिभ तेथे जास्तवेळ स्थिर राहते हे लक्षात येईल. ‘र्’ हे मृदू व्यंजन आहे. हा उच्चार जिभेने मध्यटाळूशी केलेल्या हळूवार अलगद स्पर्शाने साध्य होतो. योग्य ठिकाणी जिभ नेऊन नाजूकपणे हलकासा स्पर्श मध्यभागात टाळूला करून तो तसाच स्पर्श स्थिर ठेवणे, हे येर्‍यागबाळ्याचे काम नाही (!), हा असा उच्चार केवळ मराठीलाच जमतो ! ! काशीचे संस्कृत पंडीतही मराठी व्यक्तीकडून संस्कृतचे उच्चार अचूक होतात, असे म्हणतात. उगाच नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकालाही गागा भट्टाला बोलावले गेले!

या लेखातून एक महत्त्वाचा टप्पा आपण गाठला आहे. अक्षरांच्या उच्चारात व्यंजनाचा उच्चार ‘सर्वात कमी वेळेचा व निश्चित’ असतो, हे यातून सिद्ध होते. स्वराचा उच्चार श्वास टिकेपर्यंत लांबवता येतो म्हणून त्यातल्या उच्चार वेळेत ठोस निश्चितता नसते. पण अक्षरातील व्यंजनाचा उच्चार प्रत्येकवेळी केवळ क्षणभरच टिकतो आणि तो वाढवता येत नाही, हे निश्चितपणे कळते. म्हणजेच कोणत्या घटकावर अक्षरातील वेळेचे प्रमाण अवलंबून ठेवले पाहीजे ते निश्चित होते. उच्चार वेळेचे प्रमाण म्हणजे ‘मराठीतील व्यंजन’ होय. मराठीतील हे उच्चार वेळेचे प्रमाण ध्वनीतील केवळ एकाच ‘जातीगुणवैशिष्ट्या’तून साकारते. कारण स्वराच्या आधी येणार्‍या दोन ‘जातीगुणवैशिष्ट्यां’च्या उच्चारासाठी थोडा जास्त वेळ खर्च करावाच लागतो, हे आपण सिद्ध केले आहे.

कवितेतील ओळींनी घेतलेल्या उच्चारातील वेळेचे मापन करण्यासाठी केवळ, निव्वळ आणि फक्त मराठी व्यंजनाचाच उपयोग, जगातील सर्व भाषांना करावा लागणार आहे. ही आहे मराठीतील शास्त्रीयात आणि सर्वसमावेशकता. यातून टप्प्या टप्प्यातून मराठी भाषेचे सार्वभौमत्व नक्कीच सिद्ध होईल असा मला विश्वास वाटतो.

आपला अभिप्राय व्यक्त करून चर्चेसाठी https://www.facebook.com/groups/togangal/ या ग्रुपवर सामिल होणार का?
आपला, शुभानन गांगल   मोबाईल 9833102727 ईमेल – gangal@gmx.com

No comments:

Post a Comment