Tuesday 10 September 2013

2 – मराठी गद्य-पद्य आणि अक्षर उच्चारातील वेळ



कवितेचे विद्यालय –
2 – मराठी गद्य-पद्य आणि अक्षर उच्चारातील वेळ

गद्य आणि पद्य हे दोन भिन्न शब्द आहेत आणि त्यांचा अर्थही भिन्न आहे. गद्यात वाक्ये असतात आणि पूर्णविरामाने त्यांचा शेवट होतो. पद्यात ओळी असतात. पद्यातील ओळी ठराविक कालावधीत संपणार्‍या उच्चार वेळेवर अवलंबून असतात. ओळीने उच्चारासाठी घेतलेला लयबद्ध वेळ हाच जणू त्या ओळीचा शेवट दर्शविणारा ‘पुर्णविराम’ ठरतो. म्हणूनच ‘पद्य म्हणजे लयबद्ध अक्षररचना होय’ असे माननीय प्रा. माधव त्रिं. पटवर्धन (माधव ज्युलियन) यांनी त्यांच्या ‘छन्दोरचना’ ग्रंथात म्हटले आहे.

मराठी भाषा सुक्ष्मतेकडून भव्यतेकडे झेपावणारी आहे, असे संत ज्ञानेश्वर यांनी म्हटले आहे. महाराष्ट्रात सर्वात जास्त संत झाले. केवळ महाराष्ट्रातच सर्वात जास्त संत का बरे निर्माण झाले? याचे कारण ‘मराठी भाषा’ आहे. काय खरे नाही वाटत? चला थोडा सारासार विचार करू. संत होण्यासाठी दोन महत्त्वाच्या गोष्टींची नितांत आवश्यकता असते, 1) आदर्श ठरणारी परीपक्व अध्यात्मकतेची जाण, 2) काव्यातून आपले विचार मांडण्याची कला. भाषा जर परीपूर्णपणे सक्षम असेल तर काव्यातून विचार मांडण्यासाठी ती सुयोग्य ठरते आणि तेच मराठीबाबत खरे ठरते. काव्यासाठी जगातील सर्वात परीपूर्णपणे सक्षम ठरणारी भाषा मराठी आहे. ही केवळ मराठीच्या प्रेमामुळे लिहीलेली वाक्यरचना नाही. आपण ‘कवितेचे विद्यालय’ या भागातून हे पुराव्यानिशी स्पष्ट करून, सिद्ध करणार आहोत. यातील बराच भाग नव्याने मांडणी केलेला आढळेल, पण तेच खरे आणि सत्य आहे ना? पूर्णपणे मराठी आहे ना? हे सर्वांनी तपासायचे आहे.

अक्षराने उच्चारासाठी घेतलेल्या वेळेचे तीन भाग पडतात. वेगवेगळ्या भिन्न कारणांमुळे हे तीन भाग पडतात. ही सर्व कारणे पूर्णपणे नैसर्गिकपणावर म्हणजेच निसर्ग नियमांवर आधारलेली आणि मराठीने अंगिकृत केलेली, म्हणजेच मराठी भाषेच्या अंतरंगातील कणाकणात झिरपलेली आहे.  1) मराठी अक्षराचा शेवट स्वराने होतो आणि अक्षरातील स्वराचा उच्चार श्वास टिकेपर्यंत लांबलचक करता येतो. यामुळे मराठी स्वराचे आखुड, वाढीव आणि लांबडा असे तीन भाग पडतात. 2) स्वराच्या कमीतकमी वेळेत केलेल्या उच्चार वेळेचे र्‍हस्व आणि दीर्घ असे दोन भाग पडतात. हे निसर्गाने मानवावर लादलेले उच्चार-वेळेचे तंत्र आहे. 3) मराठी भाषेतील व्यंजन आणि स्वर सुक्ष्मतम ठरतात. यामुळे प्रत्येक अक्षरातील स्वराचा अपुरा, नियमीत आणि लांबट उच्चार होतो. हा भाग मराठी भाषकांच्या उच्चारातून आपोआप निर्माण होतो.

आजवर मराठीचे असे शास्त्रीयतेने अभ्यासपूर्वक विश्लेषण करून गटवारीतून ते स्पष्ट केले गेले नाही. यातील काही भाग जणू मराठीतील काही तृटी वा कमतरता वा चुका म्हणून संबोधल्या गेल्या. मराठीच्या लिपीला ‘मराठमोळी’ असे नाव देऊन, मराठीचा मराठीसाठी मराठीपुरताच मराठीपणातून विचार करून मराठीची जडणघडण मांडणे यासाठीच अतिशय महत्त्वाचे ठरते.
इतर भाषांना काव्यासाठी अक्षर उच्चारातील केवळ लघू-गुरू ही संकल्पना वापरता आणि अवलंबिता आली. अक्षराच्या लघू उच्चाराला एक आणि अक्षराच्या गुरू उच्चाराला दोन असे अंक देऊन कवितेच्या ओळीतील अक्षर उच्चाराने घेतलेला एकूण वेळ जाणणे इतर भाषांना जमले. यापेक्षा कवितेच्या ओळीतील अक्षर उच्चाराने घेतलेल्या एकूण वेळेबाबत, अधिक सुक्ष्मतेची जाण, मराठी भाषा आपसूकपणे करून देते. होय हे सत्य आहे. त्यामुळेच महाराष्ट्रातील संतांनी आपापल्या विचारांची मांडणी भिन्न काव्य पद्धतींतून व्यक्त केलेल्या आढळतात.

इतर भाषांनी अक्षर उच्चाराने घेतलेल्या एकूण वेळेबाबत वापरलेले काव्य-परिमाण (काव्यातील अक्षर-उच्चार-वेळ मोजण्याचे प्रमाण) लघू-गुरू यावरच मर्यादीत असते. मराठीला मात्र हेच प्रमाण (अक्षर-उच्चार-वेळ मोजण्याचे साधन) ‘व्यंजनाने घेतलेल्या वेळेवर’ बेतता आले आहे.

उदाहरण - तुम्ही ‘प, का, हो’ ही अक्षरे श्वास टिकेपर्यंत लांबलचकपणे उच्चारा. त्यातील व्यंजनाचा उच्चार वाढवता येत नाही. व्यंजनाचा उच्चार केवळ क्षणभर टिकतो. हा जो क्षणभराचा काळ असतो त्याचा वापर ‘अक्षर-उच्चार-वेळ मोजण्याचे प्रमाण’ म्हणून मराठीला वापरता येते. प्रत्येक मराठी माणूस त्याच्याही कळत नकळत हे आपसूकपणे जाणतो, हे मराठीचे अद्वितीय असाधारण अनोखे वैभव आहे.

हा लेख ‘अक्षर उच्चारातील वेळ’ याबाबतची प्रस्तावना देऊन थांबवत आहे. कृपया आपण हा लेख आवडला का? याचे आटोपशीरपणे ‘होय’ वा ‘नाही’ असे कमीतकमी उत्तर द्यावे ही विनंती. शिवाय आपला अभिप्राय व आपले मत व्यक्त करून यात सहभागी झालात तर एकत्रीतपणे यातील योग्यता तपासणे शक्य होईल.
https://www.facebook.com/groups/togangal/permalink/193653567473096/?qa_ref=qd
आपला, शुभानन गांगल   मोबाईल 9833102727 ईमेल – gangal@gmx.com

No comments:

Post a Comment